
कधी गीता साधक, कधी सेवी
माझी पहिली गीता मला गीता परिवाराकडून मिळाली. माझा गीतेशी परिचयच गीता परिवाराने घडवून आणला.
अशी मी एक गीता प्रवासी.
माझ्या आईच्या सांगण्यावरुन मे 2021 मध्ये मी साधक म्हणून गीता परिवारात सामील झाले. चार धाम यात्रेतील पहिला टप्पा सुरु झाला. मन थोडे साशंक होते पण अजित दादांनी आम्हाला खूप सुंदर शिकवले. वर्गाची गोडी निर्माण झाली. शाळेपासूनच उच्चार स्पष्ट होते त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच श्लोक जमू लागले. दादांकडून कौतुकाची थाप मिळू लागली आणि पुन्हा शाळेत गेल्यासारखे वाटले. पुढचा श्लोक शिकायची उत्सुकता, श्लोक म्हणायची आपली पाळी जवळ आली की होणारी धाकधूक, शनिवारी/रविवारी होणारे अर्थ विवेचन या सगळ्याची गोडी लागली आणि माझी यात्रा सुरु झाली.
आम्हाला L3 आणि L4 दोन्ही स्तरांत वंदना काकी विवेचक म्हणून लाभल्या. त्या नेहमी ज्ञानेश्वरीतले दाखले द्यायच्या. त्यांच्या विवेचनाला मराठी मातीचा गंध असायचा आणि मग ते आणखीनच आपलेसे वाटायचे. पण इथल्या सगळ्याच विवेचकांना ऐकणे म्हणजे मोरोपंतांच्या केकावलीची प्रचिती घेणे आहे- 'सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो.’
L1 सुरु असतानाच Tech Assistant होण्यासाठी ग्रुपमध्ये सामील व्हा असा संदेश आला आणि मी लगेच उत्साहाने त्यात सहभागी झाले. गीतासेवी कार्यक्रमाआधीच Tech Assistant चा ग्रुप जॉईन केला. आणि माझ्यातल्या गीता सेवीचा प्रवास सुरु झाला. L2 शिकता शिकता L1 ची Tech झाले. माझ्या L2 च्या Tech ना अडचणीमुळे काही दिवस Class घेता आला नाही तेव्हा आमचा L2 वर्ग Tech म्हणून सांभाळला. आत्मविश्वास अजून बळावला. L1 ते L4 च्या सेवेत जे साधक भेटले त्यातले काही अजूनही आठवण काढतात, मेसेज करतात. हीच खरी पुंजी. Tech ची सेवा देता देता Adding, Super Tech, Exam Tech, Content Forwarding विभागात सेवा द्यायला लागले. तशातच एक दिवस स्वामिनाथन भैय्यांनी मराठी MTT (Msg Translation Team) जॉईन करायला प्रोत्साहन दिले. सद्ध्या मी Content Forwarding Department आणि मराठी MTT चे नेतृत्व करत आहे.
हैदराबाद मैत्री मिलनच्या निमित्ताने काही सेवींना प्रत्यक्ष भेटता आले. त्यात श्रद्धा ताईंसारखी गोड मैत्रीण मिळाली. या सर्व प्रवासात मी काय पाहीले, काय शिकले, काय मिळविले? लोकांच्या स्वभावातले निरनिराळे कंगोरे पाहीले. निःस्वार्थ भावनेने सेवा देणारे कार्यकर्ते बघितले. एकाचवेळी साधक आणि सेवी यांची सांगड घालणारा Learngeeta हा अद्वितीय उपक्रम जवळून अनुभवला. शाळेत शिकणाऱ्या, 14 वर्षांच्या प्रिया दीदीला संपूर्ण एक
विभाग सांभाळताना बघितला. सेवेचा एवढा उत्साह वयाने मोठ्या आमच्या सारख्यांकडेही नसेल. ही वयाने लहान तर प. पू. स्वामीजी चिरतरुण! हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी, एकत्र आणण्यासाठी अखंड परिश्रम आणि त्यासाठी सतत फिरतीवर. वयाची सत्तरी उलटल्यावरही एका तरुणाला लाजवणाऱ्या उत्साहाने स्वतःहून पायाला चक्र लावून त्या चक्रधारी श्रीकृष्णाला जनामनात वसविण्यासाठी झटणारे. त्यांची ही ऊर्जा स्वराज्य निर्मितीसाठी सज्ज झालेल्या शिवाजी महाराजांची आठवण करुन देते. आदरणीय आशू भैय्यांनीही श्रद्धेने स्वामीजींचे ध्येय हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनविले आहे. आपला व्यवसाय आणि गीता परिवाराचा कारभार ते आपल्या सक्षम खांद्यांवर लीलया पेलत आहेत. एवढंच नाही तर गीता परिवार सतत प्रगतीशील असावा याची ते दक्षता घेतात. गीता परिवारातील सगळ्याच वरिष्ठ सन्माननीय सदस्यांचा व्यासंग, अभ्यास, गीतेविषयीची तळमळ पाहून मन थक्क होतं. आपणही गीतेचा अभ्यास वाढवावा, सुरात गीता गाता यावी ही इच्छा प्रबळ होत जाते. चारही स्तर पूर्ण झाल्यावरही सेवी आणि साधक ही दोन्ही रुपे हातात हात घालून चालतात.
रात्रीचा दिवस करणाऱ्या या दिग्गजांमध्ये आपली सेवा ही फूल ना फुलाची पाकळी आहे. पण या रामसेतूत आपलाही खारीचा वाटा आहे हा विचारही आनंद देऊन जातो. विधात्याने आपल्याला ही संधी दिली हेही नसे थोडके.
सदा सर्वदा योग तुझा घडावा,
तुझे कारणी देह माझा पडावा।
उपेक्षू नको गुणवंता अनंता,
रघूनायका मागणे हेची आता॥

- सौ. रिया राजेश खानविलकर, हैदराबाद

